लखनौ संघावर बीसीसीआयची कारवाई   

नवी दिल्ली : मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यात मुंबईने ५४ धावांनी बाजी मारली. मुंबई इंडियन्सचा संघ या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजीसाठी मैदानात आला. रायन रिकल्टन आणि सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकांच्या बळावर मुंबईने २० षटकांअखेर २१५ धावांचा डोंगर उभारला. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या लखनऊच्या फलंदाजांना अवघ्या १६१ धावांपर्यंत मजल मारता आली. दरम्यान, या सामन्यानंतर कर्णधार ऋषभ पंत आणि संपूर्ण लखनऊ सुपर जायंट्स संघावर कारवाई करण्यात आली आहे.
 
लखनऊ सुपर जायंट्स संघाने आयपीएलच्या स्लो ओव्हर रेटच्या नियमांचे उल्लंघन केले आहे, त्यामुळे ऋषभ पंतवर २४ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. ऋषभकडून ही चूक दुसर्‍यांदा घडली आहे. कर्णधार असल्यामुळे ऋषभ पंतवर २४ लाख तर प्लेइंग ११ मध्ये असलेल्या इतर खेळाडूंवर ६ लाख किंवा मॅच फीवर २५ टक्के दंड आकारला जाईल, यात इम्पॅक्ट प्लेअरचादेखील समावेश असणार आहे.
 
या सामन्यात मुंबई इंडियन्सचा संघ नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला. प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्मा आणि रायन रिकल्टनची जोडी मैदानावर आली. रोहितने सुरुवातीलाच मयांक यादवच्या षटकात दोन षटकार खेचले, मात्र त्यानंतर त्याला बाद होऊन माघारी परतावे लागले. रोहित बाद झाल्यानंतर रायन रिकल्टनने गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. रिकल्टनने ५८ धावांची खेळी केली, तर सूर्यकुमार यादवने २८ चेंडूंचा सामना करत ५४ धावा चोपल्या. शेवटी नमन धीरने २५ धावा करत संघाची धावसंख्या २१५ धावांवर पोहोचवली.
 
लखनऊ सुपर जायंट्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी २१६ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना आयुष बदोनीने ३५ धावा, तर मिचेल मार्शने ३४ धावा चोपल्या. मात्र, जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीसमोर लखनऊच्या फलंदाजांनी नांग्या टाकल्या. बुमराहने या डावात ४ गडी बाद केले. लखनऊला हा सामना ५४ धावांनी गमवावा लागला.
 

Related Articles